उन्हाळी तीळ लागवड: माहिती आणि मार्गदर्शन

उन्हाळी तीळ लागवड: माहिती आणि मार्गदर्शन

तीळ हे एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. तीळ पिकाची वाढ 85 ते 90 दिवसात होत असल्याने, खरीप हंगामासोबत उन्हाळ्यातही याची लागवड केली जाते.

हवामान

  • तीळ हे अत्यंत नाजूक आणि संवेदनशील पीक आहे. तापमान, सूर्यप्रकाश आणि वातावरणातील आद्रता यांचा पीक वाढीवर परिणाम होतो.

सविस्तर माहिती साठी व्हिडिओ पहा 👇👇

  • उगवणीनंतर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस, कायिक वाढीसाठी 21 ते 26 अंश सेल्सिअस, तर फुलधारणा अवस्थेत 26 ते 32 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक आहे. तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास फुलगळ होते.
  • वाणानुसार फुल धारणेची सुरुवात होते. पीक प्रकाशाच्या कालावधीला संवेदनशील आहे. प्रकाशाचा कालावधी जास्त असल्यास बियाण्यातील तेलाचे प्रमाण वाढते, तर प्रथिनांचे कमी होते.

जमीन

  • मध्यम ते भारी व उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन लागवडीस निवडावी. वालुकामय पोयट्याच्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास हे पीक चांगले येते.
  • जमिनीचा सामू 5.5 ते 8.0 इतका असावा.

पूर्वमशागत

  • तिळाचे बी आकाराने लहान असते. तसेच पिकाची सुरुवातीची वाढ ही हळू होते. त्यामुळे जमीन चांगली भुसभुशीत करून घट्ट दाबून घ्यावी.
  • खोल नांगरट केल्यानंतर कुळवी करून जमीन भुसभुशीत करावी किंवा रोटाव्हेटरच्या साह्याने जमीन तयार करावी.
  • पेरणीपूर्वी जमिनीवर लाकडी फळी फिरवून जमीन दाबून सपाट करून घ्यावी. उगवण चांगली होण्यास मदत मिळते.

सुधारित वाण

  • तीळ हे पीक हवामानातील विविध घटकांस अतिशय संवेदनशील असल्यामुळे विभाग व हंगामनिहाय शिफारशीत वाणांची पेरणीसाठी निवड करावी.
  • उन्हाळी तिळासाठी फुले पूर्णा, ए.के.टी. – 101 या वाणांची लागवड करावी.

पेरणी

  • उन्हाळी तीळ पिकाची पेरणी 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. पेरणी शक्यतो बैल पाभरीने करावी. पाभरीने पेरणी करताना विषाणांमध्ये बारीक वाळू किंवा चाळून घेतलेले शेणखत मिसळावे.
  • पेरणी 30 बाय 15 सें.मी. किंवा 45 बाय 10 सें.मी. अंतरावर करावी.
  • पेरणी करताना बियाणे 2.5 सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी, बियाणे जास्त खोलवर पडल्यास त्याचा उगवणीवर परिणाम होतो.

विरळणी

  • पेरणीनंतर तीन आठवड्यांच्या आत विरळणी करावी. पिकाच्या योग्य वाढीसाठी व अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रोपांची संख्या 2.22 लाख प्रति हेक्टर इतकी ठेवावी.
  • त्यासाठी 45 सें.मी. अंतरावर पेरणी केलेली असेल, तर दोन रोपांत 10 सें.मी. अंतर ठेवून विरळणी करावी. पेरणी 30 सें.मी. अंतरावर केली असल्यास, दोन रोपांतील अंतर 15 सें.मी. इतके ठेवून विरळणी करावी.

खत व्यवस्थापन

  • शेवटच्या कुळवणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 5 ते 6 टन प्रमाणे जमिनीत मिसळावे. किंवा हेक्टरी एक टन निंबोळी पेंड पेरणीबरोबर द्यावे.
  • तीळ पिकास नत्र 50 किलो प्रति हेक्टर देण्याची शिफारस आहे. त्यापैकी नत्राची अर्धी मात्रा म्हणजेच 25 किलो नत्र पेरणीवेळी, तर उर्वरित अर्धी मात्रा पेरणीनंतर 21 दिवसांनी द्यावी. नत्राची दुसरी मात्रा दिल्यानंतर पिकास पाणी द्यावे.
  • हेक्टरी 25 किलो स्फुरदाची मात्रा द्यावी.
  • जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास, पेरणीच्या वेळी हेक्टरी 20 किलो गंधक किंवा झिंक द्यावे.
  • अधिक उत्पादनासाठी पीक फुलोऱ्यात आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत असताना, युरिया (2 टक्के) म्हणजेच युरिया 20 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

आंतरमशागत

  • तिळाचे पीक सुरुवातीला फार हळू वाढते. रोपावस्थेत हे पीक अत्यंत नाजूक असून पिकाबरोबर वाढणाऱ्या तणांबरोबर पाणी, अन्नद्रव्यांसाठी स्पर्धाक्षम असते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तण नियंत्रण करणे आवश्यक आहे.
  • त्यासाठी पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी व निंदणी करावी. तर 30 ते 35 दिवसांनी दुसरी कोळपणी करावी. गरजेनुसार निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.

पाणी व्यवस्थापन

  • तीळ पीक पाण्यासाठी फारच संवेदनशील आहे. तिळाचे पीक हे पाण्याचा ताण सहन करणारे असले तरी उन्हाळी हंगामात पाण्याचा ताण पडू नये.
  • पीक उगवणीसाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • पिकास फुले येण्याच्या तसेच बोंडे धरण्याच्या वेळेस पाण्याचा ताण पडू नये.

कापणी

  • जेव्हा झाडाची पाने पिवळी पडून गळू लागतात आणि बोंड्या पिवळसर किंवा तपकिरी रंगाच्या होतात, तेव्हा पीक काढणीस आले असे समजावे.
  • पीक जास्त पिकल्यास बोंड्या फुटून त्यातील बी जमिनीवर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेवर कापणी करणे आवश्यक आहे.

Leave a Comment